गट शेतीशिवाय पर्याय नाही, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गट शेतीशिवाय पर्याय नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गट शेतीमुळं बार्गेनिंग पॉवर वाढते. गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा, नवीन पद्धतीचा वापर करण्याची क्षमता तयार झाल्याचे फडणवीस म्हणाले. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणार असे फडणवीस म्हणाले. पानी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा 2022 चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी पानी फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या शेतीत रासायनिक खतांचा व कीटकनाशकाचा बेसुमार वापर होत असल्यानं आपल्या काळ्या आईची शक्ती जवळपास संपल्यात जमा आहे. यासाठी आता विषमुक्त व शाश्वत शेती काळाची गरज झाली आहे. गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांवर अनेक संकटं आली आहेत. यासाठी शेतीत बदल आवश्यक झाला आहे. दुसरीकडे रासायनिक अन्न खाल्ल्याने कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक चार ते पाच घरानंतर कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत. हे टाळायचं असेल तर नैसर्गिक शेतीच आपल्याला करावी लागेल असे फडणवीस म्हणाले.

नापीक असलेली जमीन आम्हाला द्या. त्याचा आम्ही शेतकऱ्यांना सलग तीस वर्षे मोबदला देऊ. त्यानंतर ती शेती परत देऊ असेही फडणवीस म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथा ऐकल्यावर जसं स्फुरण चढतं, तशा गाथा तुम्हा शेतकऱ्यांच्या ऐकल्यावर नाउमेद झालेल्या शेतकऱ्यांमध्ये स्फुरण चढेल. तो शेतकरी देखील हनुमान उडी घेईल असे फडणवीस म्हणाले.