शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओवरुन एकीकडे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना आज अधिवेशनातही त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. शिवसेनेच्या महिला आमदारांनी आज विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित केला. महिलेनं स्वतःला किती वेळा सिद्ध करायचं असा प्रश्न विचारत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव आणि मनिषा चौधरी यांनी यांनी या प्रकरणात कारवाईची करत मास्टरमाईंड ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसंच आमदार भारती लव्हेकर यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करत चौकशीची मागणी केली आहे.
एका महिलेने कितीवेळा स्वत:ला सिद्ध करायचे, असे यामिनी जाधव म्हणाल्या आहेत. तसेच या घटनेमागचा मास्टरमाईंड कोण आहे ते शोधून त्याला शासन करा, असे आमदार मनिषा चौधरी म्हणाल्या आहेत. हा एका महिलेच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. याआधी देखील त्यांच्याविषयी टॉयलेटमध्ये घाणेरडे लिहिण्यात आले होते. याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. मला यावर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडून उत्तर हवे आहे, असे चौधरी म्हणाल्या आहेत.
