हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर राहणार नाहीत; वकिलांमार्फत बाजू मांडणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर ते गेल्या 50 तासांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आज त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. आज त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज हसन मुश्रीफ कुटुंबाला भेटण्यासाठी कागलमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मी दोन दिवस बाहेर होतो. ईडी चौकशीला आज हजर राहणार नाही; मुदतवाढ मागणार. असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात आज प्रत्यक्ष उपस्थित उपस्थित राहणार नाहीत. ते त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कारखान्यात झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे धाडी पडल्या आहेत. त्यामुळे ते आज ईडीच्या चौकशीला सामोरे जातात का? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थिती लावणार का? याकडेही आता लक्ष लागलं आहे.