समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावणार असल्याची घोषणा केली. तसेच महामार्गावर जिथे एंट्री होते, तिथेच गाडीतल्या प्रवाशांची तपासणी केली जाईल. जास्त प्रवासी असतील, तर अडवले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथून शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला झालेल्या अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. आमदार संजय रायमुलकर आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत प्रश्न विचारत अपघातप्रवण स्थळांवर उपायोजना करणार का, असा सवाल केला.

आमदार रायमुलकर म्हणाले की, काही अपघातप्रवण स्थळ आहेत. त्यांची चौकशी करून दुरुस्त करणार आहात का? या अपघातात जे मृत्युमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करणार का, असा सवाल त्यांनी केला.
मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर निवेदन केले. ते म्हणाले, या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. अपघात सकाळी आठ वाजून पाच मिनिटांच्या सुमारास झाला. वाहनात जवळपास १३ व्यक्ती प्रवास करत होत्या. वाहनाची क्षमता सात व्यक्तींची होती. ओव्हरस्पीड आणि चालकाचे नियंत्रण सुटणे ही अपघाताची सकृतदर्शनी कारणे दिसत आहेत. तरी सुद्धा मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याच्या अनुषंगाने सर्व बाबी तपासून उचित कार्यवाही केली जाईल.