ड्रॅगन फ्रूट हे असेच एक फळ आहे जे त्वचेच्या अनेक आजारांवर फायदेशीर आहे आणि राज्यातील शेतकरी त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. अमेरिकेच्या वाळवंटातील या फळाची आता राज्यासह देशातील अनेक भागात लागवड केली जाते. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत. ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतलेला आहे.
केंद्र सरकारने ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जागतिक बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या भारतात तीन हजार हेक्टरवर या ड्रॅगन फ्रूटची लागवड आहे. येत्या पाच वर्षांत ही लागवड 50 हजार हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.ड्रॅगन फ्रूट ही वनस्पती 20 वर्षांपेक्षा जास्त काळ उत्पादन टिकवून ठेवते. पौष्टिक गुणधर्म जास्त असतात. तसेच मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांसाठी हे फळ चांगले आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
भारताततही ड्रॅगन फ्रूटचं क्षेत्र वाढत आहे. देशातील कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे मिझोराम आणि नागालँड या राज्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या भारतात ड्रॅगन फ्रूटचे एकूण लागवडीखालील क्षेत्र तीन हजार हेक्टरपेक्षा जास्त आहे. जे देशांतर्गत मागणी पूर्ण करु शकत नाही. त्यामुळे हे क्षेत्र 50 हजार हेक्टरपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या ड्रॅगन फळांपैकी बहुतेक थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका येथून आयात केली जातात.
