ही व्होट बँकेसाठी ‘नौटंकी’; जलीलांना बिहारच्या औरंगाबादला जावे लागेल- केंद्रीय मंत्री भागवत कराड

छ. संभाजीनगर : नामांतराविरोधात आंदोलन करताना ‘मी औरंगाबादेतच जन्मलो आणि माझा मृत्यू औरंगाबादेतच होणार’, या खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी टोला लगावला. ते म्हणाले, जलील हे औरंगाबादेत जन्मले असतील, परंतु आता या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांत त्यांना बिहारच्या औरंगाबादेतच जावे लागेल, तेव्हाच हे शक्य होईल. येथे राहिल्यास छत्रपती संभाजीनगर हेच नाव लागेल.

मुस्लीम समाजाच्या मतांसाठी खा. इम्तियाज जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतरावरून राजकीय नौटंकी सुरू केली आहे.जलील यांना संसदीय राजकारणातील सहकारी म्हणून माझे आवाहन आहे की, त्यांनी हे राजकारण बंद करावे. उपोषणाच्या आडून शहराची कायदा व सुव्यवस्था खराब करू नये. केंद्र व राज्य शासनाचा निर्णय स्वीकारून विकासाच्या राजकारणावर भर द्यावा. त्यांनी आजवरच्या खासदारकीच्या कारकिर्दीत शहर व जिल्ह्याच्या विकासात काय योगदान दिले आहे, हे देखील जाहीर करावे, असे आव्हान डॉ. कराड यांनी दिले.

मंत्री डॉ. कराड आणि राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे आज जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी केलेल्या भरीव तरतूदींची माहिती देण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कराड म्हणाले की, माझे मुस्लीम बांधव कधीही औरंगजेबाला सपोर्ट करत नाही. खासदार इम्तियाज जलील फक्त राजकारण करत आहेत. तर जलील आणि नामांतराच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांच्या घरातील किती लोकांची नावं औरंगजेब आहेत. त्यामुळे मुस्लीम लोकांना औरंगजेबाबद्दल कोणतेही सहानभूती नाही.