वर्षभरात एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणार – उद्योग मंत्री उदय सामंत

औद्योगिक वसाहतीत आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सेवा सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी कार्यरत असते. तेथे अग्निशमन यंत्रणा सक्षम करीत असताना येत्या वर्षभरात एमआयडीसीत अग्निशमन केंद्र उभारले जातील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.विधानसभा सदस्य सुभाष देशमुख, प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये सोलापूर औद्योगिक वसाहतीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच औद्योगिक वसाहतीजवळ अग्निशमन केंद्र उभारले जाण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उदय सामंत यांनी उत्तर दिले.

राज्यातील औद्योगिक वसाहतीत कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अग्निशमन केंद्र असणे गरजेचे आहे. आगीसंदर्भात घटना घडल्यास तत्काळ परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी उद्योग विभाग पुढाकार घेईल. अग्निशमन केंद्र नेमके कोठे उभारायचे याबाबत एमआयडीसी आणि संबंधित महानगरपालिकेमार्फत ठरविण्यात येईल. याबाबत ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सोलापूर दौऱ्यादरम्यान सोलापूर येथील औद्योगिक संघटनांनी कायमस्वरुपी अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी केली आहे. या केंद्रासाठी अंदाजे ४००० चौ. मी. जागा लागणार असून सदर जागा एमआयडीसी क्षेत्रात मुख्य रस्त्यालगत मिळावी असा प्रस्ताव २७ फेब्रुवारी २०२३ रेाजी एमआयडीसी मुख्यालयात आला असून याबाबत तपासणी करण्यात येत आहे.याशिवाय असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविण्याला राज्य शासनाचे प्राधान्य असून असंघटित कामगार मंडळामार्फत कामगारांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल, असेही यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.