साई रिसॉर्ट प्रकरण, अनिल परब यांना दिलासा; 20 मार्चपर्यंत अटकेपासून अंतरीम संरक्षण

दापोलीतील साई रिसॉर्ट मनी लाँडरींग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अलीकडेच सदानंद कदम यांना अटक केली आहे. या अटकेनंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली ईसीआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल परब यांनी दाखल केली आहे. यावर मंगळवारी तातडीची सुनावणी पार पडली.

मुंबई उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि आमदार अनिल परब यांना दिलासा दिला आहे. परब यांना दापोलतील साई रिसॉर्ट प्रकरणी 20 मार्च पर्यंत अंतरिम संरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. या प्रकरणात याआधी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचंही नाव पुढं आलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. हे बांधकाम अनाधिकृत आहे, असा आरोप सोमय्यांनी केला होता. शिवाय, या बांधकामासाठी आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं सोमय्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यात अनिल परब यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली होती.