यंग ग्लाेबल लिडर्स, आदित्य ठाकरेंच्या काैतुकात माेरारजी देसाई यांच्या पणतूकडे दूर्लक्ष!

मुंबई : युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) द्वारे 2023 च्या यंग ग्लोबल लीडर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. यावरून त्यांचे काैतुकही हाेत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये माजी पंतप्रधान माेरारजी देसाई यांचे पणतू मधुकेश्वर देसाई यांच्यासह सहा जणांची नावे आहेत.

भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई, टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, जिओ हाप्टिक टेक्नाॅलाॅजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकृत वैश, बायाेझेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन जोसेफ आणि पाॅलीसी 4.0 रिसर्च फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वी रत्ना यांचाही या यादीत समावेश आहे. माजी पंतप्रधान माेरारजी देसाई यांचे पणतू असलेले मधुकेश्वर देसाई यांनी वयाच्या विशीत असतानाच राजकारणात प्रवेश केला. लालकृष्ण अडवानी यांच्यासाेबत ते काम करत. त्यांना भाषण लिहिण्यासाठी मदत करत.

2011 मध्ये लालकृष्ण अडवानी यांच्या जनचेतना यात्रेत ते सहभागी झाले हाेते. 2012 मध्ये नरेंद्र माेदी यांनी त्यांच्यावर दक्षिण गुजरातची जबाबदारी दिली. आदिवासी गांवांमध्ये यात्रा काढण्यास सांगितले. 2013 मध्ये औपचारिक स्वरुपात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भारतीय जनता पक्ष युवा माेर्चाच्या उपाध्यक्षपदी सध्या ते कार्यरत आहेत.