अजित पवारांचे कही पे निगाहे, कही पे निशाणा, ठाकरे गटाच्या चाणक्यालाच उभे केले आरोपीच्या पिंजऱ्यात

मुंबई : विधानसभेत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा आविर्भाव करून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ठाकरे गटाच्या चाणक्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आपल्याच मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्यावर अजित पवारांनी तीन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

ठाकरे गटाचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांनाच अजित पवार यांनी लक्ष्य केले. अजित पवार विधानसभेत बोलताना म्हणाले, गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रात एमआयडीसीत ४ लाख १४ हजार चौरस मीटरच जागा औद्योगिकरणासाठी राखीव होती. मात्र, ती थेट बेकायदेशीरपणे रहिवासी वापरामध्ये परावर्तीत केली. त्यातून ३ हजार १०९ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळायला हवा होता. मात्र, त्याऐवजी फक्त १६८ कोटी मिळाले. म्हणजे तीन हजार कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप अजित पवारांनी केला. हा आरोप करताना अजित पवार एक गोष्ट विसरले की ते सांगत असलेल्या अडीच वर्षांत महविकास आघाडीचे सरकार होते. दस्तुरखुद्द अजित पवार या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. त्यांच्या नाकाखाली हा भ्रष्टाचार झाला असताना तेव्हाच त्यांना समजले नाही का? असा प्रश्न निर्माण होतो.

अजित पवार यांना आता हे सगळे आठविण्याचे कारण म्हणजे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार भूषण देसाई यांनी जर तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असेल तर त्याला त्यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाईच जबाबदार नाही का? अजित पवार यांचे हे आरोप म्हणजे कही पे निगाहे, कही पे निशाणा असे नाही ना, अशी चर्चाही आता सुरू झाली आहे. देसाई हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकवर्तीय मानले जातात. त्यामुळे अजित पवार आरोप करत असलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे थेट त्यांच्या पर्यंत पोहोचविण्याचा तर अजित पवार यांचा उद्देश नाही ना, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.