कोल्हापुरात नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी – चंद्रकांत पाटील

राज्य मंत्रिमंडळाकडून कोल्हापुरात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. याबाबतचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासनाला सादर केला होता. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी 221 कोटी 48 लाख रुपये इतक्या खर्चासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (2023-24) सुरु होणाऱ्या या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 300 विद्यार्थी असणार आहे. महाविद्यालय सुरु करण्याबाबतच्या काही तांत्रिक बाबींच्या पूर्ततेची प्रक्रिया आता सुरु होईल. दरम्यान, महाविद्यालयाची सारी व्यवस्था पहिल्या टप्प्यात शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असेल.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑटोमोबाईल, ऑटोमेशन, टेलिकम्युनिकेशन, उर्जानिर्मिती इत्यादी क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणात झालेला औद्योगिक विस्तार तसेच सूत गिरणी, साखर कारखाने, कापड गिरण्या, फाऊंड्री, मशिन शॉप इत्यादींचा औद्योगिक विस्तारातील सहभाग लक्षात घेता, कोल्हापूर जिल्हयामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची आवश्यकता होती.यामध्ये आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अॅन्ड डाटा सायन्स, मेकॅनिकल अॅन्ड ऑटोमेशन इंजिनिअरींग,कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड इंजिनिअरींग, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग ही अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.असेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.