नाशिक : गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पणप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ भावुक झाले. मधल्या काळात अनेक अडचणी आल्या. गोपीनाथराव असते तरे माझी अडीच वर्ष जेलमध्ये नक्कीच गेली नसती, असे त्यांनी सांगितले.
भुजबळ म्हणाले की, “पहाडासारखा माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा राहिला असता. परंतु दुर्दैवाच्या सीमा कधी कळत नाहीत. पण महाराष्ट्राचा हा पठ्ठा आज हवा होता. ते आज असते तर त्यांनी ओबीसींची जातीय जनगनणा करून घेतली असती. ओबीसींना एकत्र करायचं, राज्यातल्या ५४ टक्के लोकांना एकत्र करायचं काम सोपं नव्हतं. यात ३०० ते ४०० जाती आहेत. त्यांचे प्रश्न गोपीनाथ मुंडे यांनी सोडवले.
गोपीनाथ मुंडे यांनी मला ओबीसी चळवळीत मोठा भाऊ मानलं होतं. ओबीसी चळवळीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तसेच राज्यात भाजपाला मोठं करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यासाठी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना विसरता येणार नाही. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात सर्वात आधी माधवंचा प्रयोग (माळी, धनगर आणि वंजारी) केला, असेही भुजबळ म्हणाले.
