मराठी सिनेमा क्षेत्रातून एक महत्वाची व दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (18 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या सिनेकारकिर्दित त्यांनी आजवर 300 हुन अधिक सिनेमात काम केले आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
भालचंद्र यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. असला नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई, सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. भालचंद्र यांनी आजवर 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी अभिनय क्षेत्रापासून लांब होते. याकाळात भालचंद्र हे कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील एका प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या 1984 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे गाणं खूप लोकप्रिय आहे. आजही नवरात्रीत हे गाणं नक्कीच ऐकायला येतं.
भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील मोठं योगदान राहिलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.
