मिशेल स्टार्कने टीम इंडियाचं कंबरडं मोडलं, दुसऱ्या वनडेत भारत 117 वर ऑलआऊट!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे विखुरताना दिसली. विशाखापट्टणमच्या मैदानात सुरु या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 117 धावांत सर्वबाद झाला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कनं 5 विकेट्स घेतल्यामुळे भारत 117 धावांत सर्वबाद झाला असून ही आजवरची भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-़डेमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 तर अक्षर पटेलनं नाबाद 29 धावा केल्या आहेत.

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाच्या 32 धावांवर सलामीवीर शुभमन गिल एका धावेवर बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मार्नस लॅबुशेनकरवी झेलबाद केले. त्यानंतर स्टार्कच्याच चेंडूवर रोहित शर्मा (13 धावा) बाद झाला. स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथने त्याचा झेल घेतला. कर्णधारानंतर खेळायला आलेले सूर्यकुमार यादव (0), केएल राहुल (9) आणि हार्दिक पांड्या (1) बाद झाले. तिघांनाही दुहेरी आकडा पार करता आला नाही.

यजमान संघाच्या 7 खेळाडूंना 10 धावाही करता आल्या नाहीत. यामुळेच संघ 26 षटकांत अवघ्या 117 धावांवर गारद झाला. इथून पुढे सामना आणि मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 50 षटकात 118 धावा करायच्या आहेत.ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 5 तर सिन अबॉटने 3 आणि नॅतन एलिसने 2 विकेट्स घेतल्या.