राज्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आलाय. राज्यातील जवळपास 17 लाखांहून अधिक कर्मचारी गेल्या 7 दिवसांपासून बेमुदत संपावर होते. जुनी पेंशन योजना लागू करण्याची प्रमुख मागणी या कर्मचाऱ्यांची होती. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक आज विधिमंडळात पार पडली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास काटकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असल्याची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत एक समिती नेमण्यात आली असून पुढील तीन महिन्यात ही समिती अहवाल सादर करेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आम्ही संपातून माघार घेत आहोत. उद्यापासून सर्व शाळा, रुग्णालये, सरकारी कार्यालयांतील कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर रुजू होतील, अशी माहिती काटकर यांनी दिली.
जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील जवळपास 18 लाख सरकारी- निम सरकारी कर्मचारी संपावर होते. आज सुकाणू समितीच शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विधान भवनात पोहोचले. एकूण 16 जणांचे शिष्टमंडळ विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली.
