कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आक्रमक भूमिका घेत आहेत. अशातच आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. शेतकरी कष्टकरी व्यापारी महिला वर्ग तसेच समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष सुरू असून रस्त्यावरची लढाई अद्याप संपलेली नाही. लोकांची मुंडकी पिरगळून राज्य करणाऱ्यांना ठणकावून सांगणे गरजेचे झाले आहे, असे म्हणत आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकतीने उतरणार असून हातकणंगले मतदारसंघासह पाच ते सहा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढेल अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
स्वाभिमानीचा धडक मोर्चा
दरम्यान, शेतीला दिवसा 12 तास वीज मिळावी, वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण व्हावे या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शाहूवाडी तहसील कार्यालयावर मंगळवारी (21 मार्च) धडक मोर्चा नेण्यात आला. यावेळी मोर्चा समोर शासकीय अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागली. मागण्यांची पूर्तता वेळेत न केल्यास जाब विचारण्यासाठी पुन्हा धडक मोर्चा काढू असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
राजू शेट्टी बोलताना म्हणाले की, वनविभाग जंगलात प्राण्यांसाठी पाणी चाऱ्याची सोय करत नाही. त्यामुळे प्राणी पिकांचे नुकसान करतात, शेतकऱ्यांवर हल्ला करतात. मात्र, नुकसान भरपाई आणि दवाखाना खर्च मिळत नाही. यापुढे संपूर्ण भरपाई मिळावी. वनविभागाने प्राणी शेतात येतात त्याची व्यवस्था करावी. महावितरणने खराब ट्रान्सफॉर्म बदलावेत. चुकीची वीज बिल दुरुस्त करावी ते वीज मोटर द्यावी. रेशन पुरवठ्याबाबत असणाऱ्या तक्रारी आणि पीएम किसानचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत मिळावा. अधिकाऱ्यांनी मागण्याबाबत दिलेले आश्वासने पाळून वेळेत काम करावे, अन्यथा पुन्हा मोर्चा काढून असा इशारा त्यांनी दिला.
शेट्टी पुढे म्हणाले, आम्ही मांडलेला हमीभावाचा कायदा अद्याप प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्य़ंत आमचा संघर्ष सुरुच राहिल. शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहामध्ये चर्चा झालेली नाही. त्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे प्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
