अनंतराव देशमुखांचा भाजप प्रवेश; काँग्रेससमोरील आव्हानात भर

वाशीम : जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. मागील अनेक वर्षांपासून या मतदार संघावर झनक कुटुंबाचे वर्चस्व कायम आहे. मात्र, एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर नेते, माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशामुळे येथील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे. देशमुखांमुळे भाजपची मतदार संघातील ताकद वाढली असून काँग्रेससमोरील आव्हानात भर पडली आहे.

जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघ हा अकोला लोकसभा मतदार संघात येतो. या मतदार संघावर काँग्रेसचे, विशेषत: झनक कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांवर अनंतराव देशमुख यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. एकेकाळी केवळ रिसोड-मालेगाव विधानसभाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष होता. मात्र, काँग्रेसने देशमुख यांना बळ देण्याऐवजी त्यांना सातत्याने डावलले. यामुळे देशमुखांनी काँग्रेस सोडली. तेव्हापासून काँग्रेसचा राजकीय आलेख कमी होत गेला. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर देशमुख यांनी जनविकास आघाडीची स्थापना केली.

अनंतराव देशमुख कोण आहेत?

अनंतराव देशमुख हे आमदार होते, खासदार होते. त्यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले. आज अनंतराव कुठल्याही पदावर नसले तरीही वाशिम जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंग्रह असलेला नेते म्हणून अनंतराव देशमुख यांची ओळख आहे. काँग्रेसमधील त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेसच्या खात्यात जमा करण्याचे श्रेय त्यांच्या नावे आहे. राजीव गांधी यांचे ते अतिशय जवळचे सहकारी होते‌. ज्या पद्धतीने राजीव सातव राहुल गांधी सोबत होते त्याच पद्धतीने अनंतराव देशमुख हे राजीव गांधी यांच्यासोबत राहायचे. सोबतच माधवराव शिंदे, राजेशची पायलट यांचे ते वर्गमित्र होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

अनंतराव देशमुख १९८९ आणि १९९१ दोन टर्म खासदार म्हणून वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषेवर प्रभुत्व असलेले अनंतराव देशमुख यांचा एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यावेळी गौरव देखील करण्यात आला होता. काँग्रेसमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, अशा विविध मोठ्या पदांवर त्यांनी काम केले. १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर देखील त्यांनी आपले राजकीय आणि सामाजिक काम निरंतर चालू ठेवले. २००९ आणि २०१९ ला रिसोड विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष राहून देखील त्यांचा अतिशय कमी मताने पराभव झाला. वाशिम जिल्हा स्थापनेपासून वाशिम जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता ठेवणारे तसेच वाशिम जिल्ह्यातील विविध पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपरिषद यावर अनंतराव देशमुखांची सत्ता कायम आहे.

काँग्रेसचे गॉडफादर म्हणून ओळख
वाशीम जिल्ह्यातील काँग्रेसचे गॉडफादर म्हणून देखमुख यांची ओळख आहे. जिल्ह्यात प्रचंड जनसंग्रह असून तब्बल चार दशकं काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात अनंतराव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग गेल्या दीड वर्षांपासून अनंतरावांच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकसभा व विधानसभा मतदार संघामध्ये काँग्रेसची घसरण होत असताना पक्ष अनंतराव देशमुखांना सन्मान देईल, अशी अटकळ होती. परंतु, पक्षाकडून कोणतीच हालचाल न झाल्याने अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.