राज ठाकरेंची आज तोफ धडाडणार; भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांची तोफ शिवतीर्थावर धडाडणार आहे. 17 मार्चला मनसेने गुढीपाडव्या रॅलीचा टीझर प्रदर्शित केला होता. आज संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे कोसळलं. त्यावेळी राज ठाकरेंनी “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो.” असं ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं. या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव कुठेही घेण्यात आलेलं नव्हतं मात्र उद्धव ठाकरेंकडेच या ट्वीटचा रोख होता. जून ते मार्च इतक्या कालावधीतही हे ट्वीट लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत जाणं, त्यांचं मुख्यमंत्रीपद आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागणं हे सगळे विषय राज ठाकरेंच्या अजेंड्यावर असू शकतात. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र हे विधानभवनात लावण्यात आलं. त्या सोहळ्याला निमंत्रण असूनही उद्धव ठाकरे गेले नव्हते. यावरही राज ठाकरे बोलू शकतात.