पुण्यात ओशो आश्रमात भक्तांनी गोंधळ घातला आहे. कोरेगावर परिसरात आचार्य रजनीस उर्फ ओशो यांचे यांचे भक्त आश्रमाचे गेट तोडून आश्रमात शिरल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी यावेळी भक्तांवर लाठीचार्ज केला असून, काहींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
आज ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून काही अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला. आधी या अनुयायांना परत जाण्याचं आवाहन करण्यात आलं. पण तणाव आणखी वाढला. त्यातच एक तरुणाने जोरदार घोषणाबाजी करत समोर आला. एवढंच नाहीतर तो पोलिसांवर धावून आल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या तरुणावर लाठीचार्ज करत ताब्यात घेतले.
आचार्य रजनीश (ओशो) यांच्या 70 व्या संबोधी दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखल्याने मंगळवारी काही अनुयायांनी आश्रमाच्या गेटबाहेर धरणं आंदोलन केलं. ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या विश्वस्त आणि व्यवस्थापन सदस्यांनी आश्रमाच्या जमिनीची तोडफोड करून ती अनधिकृतपणे विकण्याचा कट रचला आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, त्यांना आश्रमात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे असा आरोप केला.
