स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या एस श्रीसंतची आयपीएलमध्ये वापसी! मिळाली मोठी जबाबदारी

आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना गुजरात लायन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 31 मार्चला थराराला सुरूवात होणार आहे. यंदाच्या मोसमाला सुरूवात होण्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. 2013 साली स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेल्या एस श्रीशांतची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली आहे. यंदाच्या हंगामात त्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने स्टार खेळाडूंच्या कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली आहे. या कॉमेंट्री पॅनलमध्ये माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतचाही समावेश करण्यात आला आहे. एस श्रीसंत पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहे.कॉमेंट्री पॅनेलमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये लिटल मास्टर सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग, इरफान पठाण, मुरली विजय, लक्ष्मीपती बालाजी, सुब्रमण्यम बद्रीनाथ, संदीप पाटील आणि महिला क्रिकेटपटू मिताली राज यांचाही समावेश असणार आहे.

श्रीशांत आयपीएल 2013 च्या मोसमात स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला होता. राजस्थान रॉयल्स संघात असताना श्रीशांतला स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात राजस्थानमधील अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांचाही सहभाग होता. बीसीसीआयने श्रीशांतवर आजीवन बंदी घातली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने श्रीशांतला आरोपातून मुक्त केलं आहे.