योगगुरू बाबा रामदेव यांनी केंद्र सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे. सरकारने या दिशेने लवकरात लवकर प्रभावी पावले उचलावीत आणि २०२४ पूर्वी हा कायदा लागू करावा, अशी मागणी रामदेव बाबा यांनी केली.
आपल्या डोळ्यासमोर भव्य राम मंदिर उभारलं जावं, हे जनतेचं स्वप्न आहे. पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिराचं उद्घाटन होणार, ही आनंदाची बाब आहे. देशात कलम-३७० हटवण्यात आलं. आता फक्त दोनच कामं उरली आहेत, असं बाबा रामदेव म्हणाले.
यावेळी योगगुरू रामदेव म्हणाले की, राम मंदिरासोबतच या देशाचे राष्ट्रीय मंदिरही उभारले पाहिजे. त्याचबरोबर चारित्र्य घडवायला हवे, व्यक्तिमत्व घडवले पाहिजे आणि दैवी नेतृत्व घडवले पाहिजे. ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम सुरू आहे.
हे सनातनच्या प्रतिष्ठेचे आणि अभिमानाचे कार्य आहे. जे रामविरोधी, देशद्रोही आहेत, त्यांच्यात खळबळ उडाली आहे, असंही बाबा रामदेव म्हणाले. राम मंदिर त्याच्या जागतिक प्रतिष्ठेसह पूर्णत्व प्राप्त करेल. पतंजलीमध्ये सनातन धर्माला विश्वधर्म म्हणून, युगाचा धर्म म्हणून स्थापित करण्यासाठी संन्याशांची दीक्षा घेतली जात आहे, असंही रामदेव बाबा म्हणाले.
संन्यास घेतलेल्या तरुण-तरुणींसाठी ऋषीग्रामची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस दीक्षा घेणारे तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये उपवास आणि पूजा करतील. चारही वेदांचे अनुष्ठान केले जाईल. सर्व तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये नऊ दिवस राहणार आहेत, असंही रामदेव बाबा म्हणाले.
