लव्ह जिहादच्या आकडेवारीवर ठाम, आंदोलन करणाऱ्यांना जशाच तसे उत्तर-मंगलप्रभात लोढा यांचा इशारा

पुणे : महाराष्ट्रात अत्यंत अयोग्य पद्धतीने लव्ह जिहाद चालला आहे. मी दिलेल्या आकडेवारीवर ठाम आहे. आंदोलन करण्यासाठी त्यांना येऊ द्या. आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत. त्यांना जशाच तसे उत्तर दिले जाईल. व्याजासहित हिशोब चुकते केले जातील, असा इशारा महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला.

लोढा यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप करत हक्कभंग दाखल केला आहे. राष्ट्रवादीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना लोढा म्हणाले, आमच्या दोन सदस्यांनी आकडेवारी दिली होती. त्याचा संदर्भ दिला. पण मी अजूनही दिलेल्या आकडेवारीवर ठाम आहे. मी घाबरणार नाही. राज्यात लव्ह जिहाद सुरु आहे. विरोधक यावर घेत असलेली भूमिका आपल्या मतदारांच्या तृष्टिकरणासाठी घेत आहेत.


त्यांना लव्ह जिहादचा अभिमान वाटत असेल पण आमच्यासाठी ही शरमेची बाब आहे, हा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी कोणी बांगला देशी आणि रोहिग्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारची भाषा करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण महाराष्ट्र त्याचे उत्तर देईल. माहीममधील मजार संदर्भातील माहिती राज ठाकरे यांनी सरकारच्या लक्षात आणून दिली. त्यावर सरकारनेही योग्य कारवाई केली. राज ठाकरे यांनी सरकारच्या लक्षात आणून दिले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. सरकारने कारवाई केली त्याबद्दल सरकारचे देखील अभिनंदन, असेही लोढा म्हणाले.