देशासह परदेशातही प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2023 या वर्षाचा पुण्यभूषण पुरस्कार मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना देण्यात येणार आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांना देखील गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी कळविले आहे.
जुलै महिन्यात हा दिमाखदार सोहळा होणार असून या पुरस्काराचे यंदाचे ३४ वे वर्ष आहे. एक लाख रुपये रोख व सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याबरोबरच कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये सेलर राधाकृष्णन्, हवालदार पंजाब एन. वाघमारे, सेलर सुदाम बिसोई, गनर उमेंद्र एन. आणि लान्स नाईक निर्मलकुमार छेत्री यांचा गौरव करण्यात येणार आहे.
दरम्यान, डॉ. मोहन आगाशे यांना या आधी 1996 साली संगीत नाटक अकादमी अवॉर्ड मिळाला होता. तर 1990 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं होतं. तर 2018 साली त्यांना विष्णूदास भावे पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं होतं. 2018 साली प्राइड ऑफ प्लॅनेट पुरस्कार आणि 2019 साली लोटू पाटील थिएटर अवॉर्डनं सन्मानीत करण्यात आलं होतं. दरम्यान, मोहन आगाशे यांनी आजवर अनेक हिट ठरलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांना भुरळ पडायची. मोहन आगाशे यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
