विधानसभेत राहुल गांधीविरोधात सत्ताधारी आक्रमक, माफी मागण्यासाठी ठराव आणणार?

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील वक्तव्यामुळे आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सावरकरांवरील वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना आमदारांनी लावून धरली. यावेळी शिवसेना आमदार संजय शिरसाट आणि भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधासभेत मोठा गोंधळ घातला. तसेच काँग्रेस आमदारांनी राहुल गांधींच्या वतीने माफी मागावी अशी मागणीदेखील शेलार आणि शिरसाट यांनी केली.

राहुल गांधींच्या विरोधकात भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी चोर है म्हणत सभागृहात सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद सुरु असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन वेळा सभागृह स्थगित केले.

आमदार आशिष शेलार यांनी यावेळी संताप व्यक्त केला. शेलार म्हणाले, “भारत स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांच्या कर्तृत्वामुळे ज्यांच्या नावापुढे स्वातंत्र्यवीर लागलं त्यांचा अपमान राहुल गांधी यांनी केला. मनिषशंकर अय्यर यांच्याविरोधात पायातील जोडे काढून बाळासाहेबांनी जोडे मारले होते, पण आता सावरकरांचा अपमान केला जातोय, भारताचा अपमान केला जातोय, राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे.

आशिष शेलारांचं बाळासाहेब थोरातांना आव्हान
एका बाजूला संजय शिरसाट आणि दुसऱ्या बाजूने आशिष शेलार राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून आक्रमक झाले होते. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा नार्वेकर शेलारांना म्हणाले की, “मी तुम्हाला बोलण्यासाठी वेळ देतो.” त्यावर शेलार म्हणाले, “तुम्ही काय देणार आहात? हे लोक (काँग्रेस) माफी मागणार आहेत का?” दरम्यान, गोंधळ काही थांबला नाही. अखेर नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक १० मिनिटांसाठी स्थगित केली.

“परदेशात जाऊन भारताविषयी बोलणं सहन केलं जाणार नाही. बाबासाहेबांनाही काँग्रेसने निवडणुकीत पाडलं होतं. या काँग्रेसने सावरकरांविषयही अपशब्द वापरले आहेत. शिवसेनाप्रमुखांनी सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केली होती, त्या मागणीला तुम्ही चिटकून आहात का,” असा प्रश्न संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.