मनमाेहन सिंगांचा अपमान आणि अध्यादेश फाडण्यावरून काळाने राहूल गांधींवर उगवलेला सूड

नवी दिल्ली : भर पत्रकार परिषदेत अध्यादेश फाडून तत्कालीन पंतप्रधान मनमाेहन सिंग यांचा केलेला अपमान. त्यानंतर व्यथित झालेल्या मनमाेहन सिंग यांनी राजीनामा देण्याची केलेली तयारी. या सगळ्याचा काळाने राहूल गांधींवर सूड उगविला आहे. ताे अध्यादेश त्यांनी फाडला नसता आणि संसदेत मंजूर झाला असता तर कदाचित त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. 2013 साली सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता. त्यानुसार खासदार, आमदाराला दोन वर्षांपेक्षा जास्ती शिक्षा मिळाली तर त्याचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द होते आणि पुढील निवडणूकही लढविता येत नाही. यानंतर मनमोहन सरकारने लोकसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालापासून राजकारण्यांना संरक्षण देण्याची तयारी सुरु केली होती. “तेव्हा या निकालाचा फटका लालू प्रसाद यादवांना बसणार होता. चारा घोटाळ्याचा निकाल येणार होता. यामुळे मनमोहन सरकारने तातडीने असा अध्यादेश आणला ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निष्प्रभ झाला असता. परंतू राहुल गांधी यांनीच तेव्हा तसे होऊ दिले नाही.

“२४ सप्टेंबरला काँग्रेस सरकारने अध्यादेशाची माहिती देण्यासाठी प्रकार परिषद बोलावली होती. तेवढ्यात राहुल गांधी पत्रकार परिषदेत पोहोचले होते. ‘हा अध्यादेश फालतू आहे आणि तो फाडून फेकून दिला पाहिजे. असे म्हणत त्यांनी तो फाडला होता. यानंतर तो अध्यादेश संसदेच्या सभागृहातून मागे घेण्यात आला होता. आज जर तो अध्यादेश असता तर राहुल गांधींना जिल्हा न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा खासदारकी घालविण्यासाठी पुरेशी ठरली नसती. मनमाेहन सिंग यांना राहूल गांधी यांनी भर पत्रकार परिषदेत आपला अपमान झाल्याचा धक्का बसला हाेता. त्यांनी याचा निषेध म्हणून राजीनामा देण्याचीही तयारी केली हाेती. याबाबत मनमाेहन सिंग यांचे निकटवर्तीय आणि नियाेजन आयाेगाचे माजी उपाध्यक्ष माॅंटेकसिंग अहलूवालिया यांनी आपल्या ‘बॅकस्टेज’ या आत्मचरित्रात लिहिले आहे. मनमाेहन सिंग या सगळ्या प्रकाराने व्यथित झाले हाेते असे त्यांनी म्हटले आहे.