अली जनाब वगैरे उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

मुंबई : अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा, असा निशाणा मालेगावातील सभेच्या उर्दू बॅनरवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे. शिवसेनेने मालेगावात होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी उर्दू बॅनर लावले आहेत. मालेगाव हा मुस्लीमबहूल भाग आहे. त्यामुळे काही ठिकाणी लागलेले बॅनर हे उर्दू भाषेत आहेत. मुस्लिम समाजाला गोंजरण्यासाठी उर्दू बॅनर लावण्यात आले आहेत, अशी टीका होत आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उर्दू ही एक भाषा आहे, त्या भाषेत कोणी काही म्हटलं तर आम्हाला काही हरकत नाही. आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही. पण आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन जर उद्धव ठाकरे लांगुलचालन करत असतील तर त्यांना याचं उत्तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल.