शरद पवार कलाकार; त्यांची चावी कुठं बी चालते – गुलाबराव पाटील

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची सभेला नेहमीच गर्दी असते. त्याला कारणही तसंच आहे. गुलाबराव पाटील आक्रमक भाषण करतात. तसेच ते मिश्किल टोलेबाजीही करतात. शेरोशायरी, किस्से आणि संदर्भ देत देत गुलाबराव पाटील कधी कुणाची टोपी उडवतील याचा नेम नसतो. तसेच बोलता बोलता एखादी धक्कादायक माहिती देऊन ते राज्याच्या राजकारणात खळबळही उडवून देतात. बिनधास्त आणि खुसखुशीत शैलीत बोलण्यासाठी गुलाबराव पाटील प्रसिद्ध आहेत. कालही त्यांनी जळगावात आपल्या खास आक्रमक आणि खुसखुशीत शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. हे सांगतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कधी काय करतील याचा भरवसा नसल्याचंही सांगून टाकलं.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चिंचपुरे गावात विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्यावरूनही आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.पाटील म्हणाले, की शेवटी ते पवार आहेत. शरद पवार कसे चावी देतात. कधी ही चावी दे, तर कधी ती चावी दे. ती चावी कुठं बी चालते. त्यांनी काँग्रेसला पटवले, उठोबा बठोबाचा एक माणूस पटवला. अशी मिसळ तयार झाली अन् हे 11 मते घेऊन पाहुण्यांना पाडून आले. त्यांनी हे वक्तव्य करत शरद पवार यांना टोला लगावला.

आमच्या पुढाऱ्यांना भानगडी पाहिजे असतात, भानगड केली नाही तर आमचं पोट भरत नाही, असं खळबळजनक विधानही त्यांनी केलं. चिंचपुरा गावाने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे त्याचे कौतुक करताना त्यांनी हे विधान करत एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या या विधानाची सध्या जळगावात जोरदार चर्चा आहे.