केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएसोबत येण्याची ऑफर दिली. देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी नागालँडप्रमाणे इतर ठिकाणीही एनडीएसोबत यावं असं आठवले म्हणाले. तसंच यावेळी रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना सल्लासुद्धा दिला आहे.
नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींकडून पवारांचें अनेक वेळा कौतुक झाले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यावरही आठवले यांनी भाष्य केलं. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य आहे. राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईत भाजपाचा संबंध नाही. राहुल गांधी यांनी आपले तोंड सांभाळून बोलले पाहिजे. मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही, असा चिमटा आठवले यांनी काढला.
