मुंबई : राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या भारतातील दोन प्रमुख शहरांच्या संघांना पहिल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचे ऐतिहासिक जेतेपद पटकावण्याची संधी मिळणार आहे. रविवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये ‘डब्ल्यूपीएल’ची अंतिम लढत रंगणार आहे.
पहिल्या महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना आज रविवारी खेळविला जाणार असून त्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून या स्पर्धेतील आपल्या शानदार वाटचालीचे शिखर गाठण्याची इच्छा मुंबई इंडियन्स संघ बाळगून असेल. मात्र या कामी कर्णधार हरमनप्रीत कौरचा फॉर्म हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय बनून राहिलेला आहे.
भारताचे कर्णधारपद भूषविणाऱ्या हरमनप्रीतने या स्पर्धेत सुरुवातीला तीन अर्धशतके नोंदविली होती. मात्र त्यानंतर गमावलेला फॉर्म तिला अजून गवसलेला नसून शुक्रवारी ‘यूपी वॉरियर्स’विऊद्धच्या सामन्यात नॅट सिव्हर-ब्रंटने नाबाद 72 धावा केल्या नसत्या, वेगळे चित्र दिसू शकले असते. हरमनप्रीतला या सामन्यात अवघ्या 14 धावा करता आल्या आणि हे मुंबई इंडियन्ससाठी महागात पडू शकले असते. परंतु सुदैवाने नॅट सिव्हरने मिळालेल्या जीवदानाचा लाभ उठवत यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजीची धार बोथट केली.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांचा पाठिंबा फारसा राहणार नसला, तरी ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू मेग लॅनिंग पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करताना हरमनप्रीतच्या खराब फॉर्मचा फायदा उठवू शकते. दिल्ली कॅपिटल्सने सावध सुरुवातीनंतर हळूहळू वाटचाल करत गुणतालिकेत वरच्या स्थानावर पोहोचण्यात आणि शेवटी मुंबई इंडियन्सची जागा घेण्यात यश मिळविले, यास फलंदाजीत चमकलेली लॅनिंग आणि अष्टपैलू मॅरिझान कॅप यांची कामगिरी प्रामुख्याने कारणीभूत आहे.तरीही कुणाचे पारडे जड ठरेल याविषयी भाष्य करणे बरोबर ठरणार नाही.
लॅनिंग, कॅपवर मदार
कर्णधार मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू मॅरिझान कॅपवर दिल्लीच्या संघाची मदार असेल. लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने नुकतेच विक्रमी पाचव्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. आता तिचा दिल्लीला ‘डब्ल्यूपीएल’चा चषक मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. लॅनिंगने (५१.६६च्या सरासरीने ३१० धावा) यंदाच्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ती अव्वल स्थानावर आहे. तिला सलामीची साथीदार शफाली वर्माची चांगली साथ मिळते आहे. जेमिमा रॉड्रिग्जच्या कामगिरीत सुधारणा गरजेची आहे. अष्टपैलू कॅपचे (आठ सामन्यांत १५९ धावा व ९ बळी) योगदान दिल्लीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. तसेच गेल्या सामन्यात अॅलिस कॅप्सीने अप्रतिम कामगिरी केल्याने तिचा आत्मविश्वास उंचावला असेल.
सर्वोत्तम पाचपैकी चार गोलंदाज हे मुंबई संघाचे आहेत हे दिसून येईल. साईका इशाक (१५ विकेट), अमेलिया केर (१३ विकेट), हेली मॅथ्यूज (१३ विकेट) व इसाबेल वाँग (१२ विकेट) या मुंबईच्या गोलंदाजांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावला आहे. सोफी एक्लेस्टोन पहिल्या स्थानी विराजमान आहे.
संघ : दिल्ली कॅपिटल्स-मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, राधा यादव, शिखा पांडे, मॅरिझान कॅप, तितास साधू, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासेन, स्नेहा दीप्ती, अऊंधती रे•ाr, अपर्णा मंडल.
मुंबई इंडियन्स-हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सिव्हर-ब्रंट, अॅमेलिया केर, पूजा वस्त्रकार, यास्तिका भाटिया, हेदर ग्रॅहम, इजाबेल वोंग, अमनज्योत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, कोमल झांजड, प्रियांका बाला, सोनम यादव, नीलम बिश्त, जिंतामणी कलिता.
वेळ : सायंकाळी 7.30 वा.
