बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी होत आहे. यासाठी अनेक पक्ष, संघटनांनी मुख्यमंत्र्यांना निवेदने दिली आहेत. अखेर विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्णय घेतला. बिहार सरकार करत असलेल्या ओबीसी जातनिहाय जनगणनेचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब लोकांसाठी योजना तयार केल्या जाणार असल्याची घोषणादेखील त्यांनी केली आहे.
आम्ही बिहारमध्ये सध्या सुरू असलेली जात निहाय जनगणना पाहण्यासाठी एक समिती पाठवणार आहोत. ही समिती याचा अभ्यास करणार आहे. हा विषय अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच या समितीमार्फत जनगणनेचा अनुभव, नेमकी कशाप्रकारे जनगणना केली. जनगणना यशस्वी झालीय का? याबाबत अभ्यास केल्यानंतर आपल्याकडे जनगणनेबाबत निर्णय होणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.बिहारचा ओबीसी जनगणनेचा प्रयोग यशस्वी झाला असेल तर स्विकारु ते नसेल तर त्यामध्ये काय कमी आहे याची पडताळणी करुन आपण निर्णय घेऊ, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
