अमृता फडणवीस धमकी प्रकरण; आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

अमृता फडणवीस धमकी प्रकरणी अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिक्षा जयसिंघानीवर अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न करणे, त्यांना धमकावणं, असे आरोप आहेत. याच प्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने आता तिला जामीन मंजूर केला आहे. आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला मुंबई सत्रन्यायालयाने ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तपासात सहकार्य करण्याच्या अटीशर्तीही कोर्टाने बजावल्या आहेत.

दरम्यान कोठडी सुनावल्यानंतर लगेच जयसिंघानी यांनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी अमृता फडणवीस यांच्या संपर्कात असल्या तरी अनिक्षा जयसिंघानी यांचा या प्रकरणाशी थेट संबंध नव्हता. त्यांचे संबंध कायम चांगले होते. कुठल्यातरी राजकीय हेतूने अनिक्षा यांना या प्रकरणात गोवण्याच प्रयत्न होत असल्याचा युक्तीवाद अनिक्षांच्या वकिलानी कोर्टात केला. चौकशी पुर्ण झाली आहे आणि या प्रकरणात दिली जाणारी जास्तीत जास्त शिक्षा देखील जामीनास पात्र आहे. त्यामुळे अनिक्षा ही विधी शाखेची विद्यार्थीनी आहे तिला जामीन मिळावा असे अनेक युक्तीवाद करण्यात आले होते.

अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी आपल्याला धमकावून आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे. पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध आयपीसीच्या कलम 120-बी (षड्यंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमृता यांनी मलबार हिल स्टेशनवर 20 फेब्रुवारी रोजी हा एफआयआर दाखल केला होता.