काल मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी माझे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं सांगितलं.
मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असून जनतेची दिशाभूल करत आहे. तर महाविकास आघाडीची लाचारी उद्धव ठाकरे करत असून त्यांनी स्पष्ट करावे की त्यांचे दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट करून जनतेतील संभ्रम दूर करावा असा टोला रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
उद्धव यांच्या भूमिकेनंतर राज्यातले भाजपा नेते, शिंदे गट आणि एनडीएतील मित्रपक्ष उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. आता आमदार रवी राणा यांनीदेखील उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. रवी राणा म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी काल जाहीर सभेत सांगितलं, सावरकर माझे दैवत आहेत. परंतु राहुल गांधी मात्र वारंवार सावरकरांचा अपमान करत आहे. असं असेल तर उद्धव ठाकरेंच्या दैवताचा अपमान सुरू आहे. यावरून उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीसोबतची लाचारी दिसत आहे.
मग उद्धव ठाकरेंची भूमिका कळेल : राणा
राणा म्हणाले की, मला वाटतंय, उद्धव ठाकरे लोकांची दिशाभूल करत आहेत. उद्धव ठाकरे यांना आता जनाब म्हणतात, त्या जनाबाप्रमाणे ते आता पूर्णपणे महाविकास आघाडीत कन्वर्ट झाले आहेत. कन्वर्ट झालेल्या उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारची दुटप्पी भूमिका दाखवून लोकांना गोंधळात टाकू नये. राहुल गांधी त्यांचं दैवत आहेत की सावरकर याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. त्यानंतर आपल्याला कळेल की त्यांची नेमकी भूमिका काय आहे.
