स्मिथ करणार आयपीएलमध्ये पुनरागमन, २०२२च्या लिलावात राहिला होता अनसोल्ड.

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ च्या लिलावात स्टीव्ह स्मिथ विकला गेला नव्हता. त्यानंतर त्याने आयपीएल २०२३ च्या लिलावासाठी आपले नाव दिले नाही. आयपीएलमध्ये पुणे सुपरजायंट आणि राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणारा स्मिथ आयपीएल २०२३ चा भाग असेल. स्मिथने स्वत: त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

खरं तर, आयपीएल २०२३ मध्ये स्मिथ मैदानावर खेळताना दिसणार नाही, तर खेळणाऱ्या खेळाडूंवर टिप्पणी करताना दिसणार आहे. स्टीव्ह स्मिथ आयपीएल २०२३ समालोचन पॅनेलचा एक भाग आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्मिथ म्हणाला, “नमस्ते इंडिया! माझ्याकडे तुमच्यासाठी एक रोमांचक बातमी आहे, मी आयपीएल २०२३ मध्ये सामील होत आहे. होय, बरोबर आहे, मी आयपीएल २०२३ मध्ये पूर्णपणे वेगळ्या संघात सामील होत आहे.”

दरम्यान या व्हिडीओनंतर विविध चर्चा सध्या होत असून काहीजण स्मिथ हा कॉमेन्ट्री करण्यासाठी आयपीएलमध्ये सहभागी होणार अशी चर्चा असून काहीजण तो केकेआरमध्ये सहभागी होईल अशी शक्यता आहे. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार हे जवळपास निश्चित झाल्याने आता त्यांना नवा कर्णधार लागणार आहे. स्मिथ अशामध्ये संघासोबत सामिल होण्याचीही शक्यता आहे.

स्मिथने एकूण १०३ आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३४.५१च्या सरासरीने आणि १२८.०९ च्या स्ट्राइक रेटने एकूण २४८५ धावा केल्या आहेत. स्मिथच्या नावावर आयपीएलमध्ये एक शतक आणि ११ अर्धशतकं आहेत.