चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान लाकूड हे देशात सर्वोत्तम आहे. या सागवान काष्ठचा अयोध्येत निर्माणाधीन श्रीराम मंदिरासाठी उपयोग करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून सागवानचे हे लाकूड बुधवारी (ता. २९) विधीवत पूजा करून शोभायात्रेद्वारे अयोध्येकडे रवाना होणार आहे. सागवान काष्ठाचा पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह वने, सांस्कृतिक कार्यमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट २०२० रोजी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. तेव्हापासून श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. सुमारे एक हजार वर्षे श्रीराम मंदिराची वास्तू टिकावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने मंदिराची इमारत उभारण्यात येत आहे. मंदिराचे महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, इतर दरवाजे यासाठी सागवान लाकडाची गरज आहे.
मंदिर निर्माण समितीने वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली होती. मुनगंटीवारांनी या विषयात व्यक्तिशः: लक्ष घालत सर्वोत्तम दर्जाचे सागवान अयोध्येला पाठविण्याकरिता नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यासंदर्भात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला माहिती मिळताच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी यासंदर्भात वनमंत्री मुनगंटीवार यांना तातडीने पत्र पाठवत या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे. सागवानचे हे काष्ठ मुनगंटीवार यांनी आपल्या हस्ते अयोध्येकडे प्रस्थान करावे, अशी विशेष विनंतीही श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चम्पत राय यांनी पत्रात केली आहे.
