उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या फोटोला चपलांनी बडवणार का? – राम कदम

ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मालेगावमधील सभेत वीर सावरकर आमचे दैवत असल्याचे सांगितले. त्यावरुन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधींनाही इशारा दिला आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, सावरकर आमचे दैवत आहेत त्यांचा अपमान आम्हाला सहन होणार नाही. अजिबात पटणार नाही. एकत्र लढायचं असेल तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला आहे.

दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. मनीशंकर अय्यर यांनी जेव्हा वीर सावरकरांचा अपमान केला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत:च्या हाताने मनीशंकर अय्यरच्या प्रतिमेला चपलेनं बडवलं होतं. त्यामुळे तुम्ही राहुल गांधींच्या प्रतिमेला चपलेनं मारणार आहात का? असा सवाल राम कदम यांनी विचारला.

राहुल गांधींचं आम्ही सहन करणार नाही असं म्हणता आणि त्याच राहुल गांधींच्या कॉंग्रेससोबत घरोबा करायचा हा दुटप्पीपणा असल्याची टीका यावेळी कदमांनी केली आहे. वीर सावरकरांविषयी जर खरं प्रेम असेल तर जसे बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या जोड्यांनी मनीशंकर अय्यर यांच्या फोटोला बडवलं तसं आपणही बडवणार आहात का? असा महाराष्ट्राच्या जनतेचा आपल्याला सवाल आहे, अशा प्रकारची जोरदार टीका राम कदमांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.