उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. अरे तुमचे ५२ काय १५२ कुळं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना दूर करू शकत नाही. प्रयत्न करून पाहा, तातडीने निवडणुका घ्या, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं होतं. याला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही. मात्र जे दोन चार टक्के आहेत ते हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. विरोधकांचे काम असते लोकांचे प्रश्न सरकार पुढे मांडून ते सोडवणे. मात्र सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.माझ्या कुळाचा उल्लेख करून उद्धव ठाकरेंना आनंद मिळतोय. माझ्या कुळाचा उल्लेख करतात यावरूनच ते किती घाबरलेत हे दिसत आहे. पुढे महाराष्ट्रात काय होतंय ते पहा. आजचे उरलेसुरले आहेत त्यातील चारच राहतील. आम्ही हिंदुत्वाचे रक्षण करणारे कार्यकर्ते आहोत तुमच्यासारखे पळपुटे नाही,” अशा शब्दात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे
“एकीकडे मांडीला मांडी लावून बसता आणि दुसरीकडे त्यांनी केलेला अपमान सहन करायचा नाही म्हणता असं म्हणतं उध्दव ठाकरे हे दुतोंडी आहेत,” असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांवर केला आहे. तसेच यावेळी बोलताना “आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणता तर मग त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही का बसला आहात?” असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.
