राहुल गांधी, सोनिया गांधींच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणतात, सर्व काही आलबेल, चिंता नसावी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटी नंतर सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी, असे त्यांनी म्हटले आहे.सावरकरांचा माफी वीर असे म्हणून अपमान केल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मालेगावचे सभेत उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या अपमानावरून राहुल गांधी यांना इशारा दिला होता. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलेल्या स्नेहभोजनावर ठाकरे गटाने बहिष्कार घातला होता.

मात्र त्यानंतर आज संजय राऊत यांनी राहुल आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी, असे ट्विट त्यांनी केले आहे. संजय राऊत म्हणाले, मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. काल त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. अर्धा पाऊण तास चर्चा झालीमहाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. विरोधी पक्षांच्या बैठकीला मी जाणार होतो पण कामात अडकून पडलो. पण विरोधकांच्या भूमिकेला आमचा पाठींबा आहे.ते म्हणाले, सावरकर हा मुद्दा सोयीचा नाही. आमच्या भावना सावरकरांशी आहेत. भाजपला ढोंग करण्याचे हत्यार मिळालं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) सावरकरांना कधीच आपलं मानलं नाही.