पुणे जिल्ह्याच सर्वसमावेशक नेतृत्व हरपले – अजित पवार

राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे बघितल जायचं.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

टेल्को कंपनीतल्या कामगार नेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचे अलोट प्रेम मिळाले. 1995 पासून 2014 पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले. 2019 ला खासदार झाले. खासदार गिरीश बापट यांचे निधन हा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे असे अजित पवार म्हणाले.

राज्याचे मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारनं लढत होतं. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनाने पुणे जिल्ह्याचे सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं आहे, असे अजित पवार म्हणाले.