शिवसेनेने महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार बनवल्यावर हिंदुत्वाच्या विचारधारेचा मुद्दा उफाळून आला शिवसेनेच्या आमदारांना सवाल केले जाऊ लागले प्रश्न विचारले जाऊ लागले. आमच्यामुळे नव्हे तर जनतेच्या या दबावामुळेच या आमदारांनी बंड केले असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.
न्यूज 18 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते. शहा म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने युती करून निवडणुका लढवल्या होत्या. या निवडणुका जिंकल्याही. मात्र पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे यांना सांगितले की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो. मुख्यमंत्री बनताना लोक त्यांच्यासोबत केले. मात्र ते सगळे जनतेमध्ये जाऊ लागले तेव्हा विचारधारेचा मुद्दा समोर आला. शिवसेना वर्षानुवर्ष हिंदुत्वाच्या विचारधारेचे राजकारण करत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पद्धतीचे राजकारण करते त्यावरून विचारधारेतील मतभिन्नता पुढे आली. शिवसेनेचा कट्टर मतदार त्यांच्या आमदारांना प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारू लागला. त्यामुळे आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. आमच्यामुळे नव्हे तर जनतेच्या या दबावामुळेच आमदारांनी ठाकरेंविरुध्द बंड केले.
जनतेचीच इच्छा होती की शिवसेना आणि भाजपने सोबत राहावे. त्यामुळे खरी शिवसेना आमच्या सोबत आली आहे. शिवसेनेसोबत आम्ही सरकार बनवले आहे. आता सोबतच निवडणूक लढवू आणि जिंकूही, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.एकनाथ शिंदे गटाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगून शहा म्हणाले, हीच खरी शिवसेना आहे. आयोगानेही ते स्पष्ट केले आहे. धनुष्यबाण हे चिन्हही त्यांना दिले आहे. त्यामुळे विलीनीकरणाबाबत कुठला विचारही सुरू नाही. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सोबत निवडणूक लढवतील. सर्वजण एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
गेल्या वेळी अनेक जण म्हणत होते की भाजपने एकट्याने निवडणुका लढवल्यास स्वबळावर बहुमत मिळवणे शक्य होईल. मलाही तेच वाटत होते असे सांगून शहा म्हणाले, शिवसेना पक्ष आमचा खूप वर्षांपासूनचा साथीदार आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने राज्यपालांनी फ्लोर टेस्ट घेण्याची गरज नव्हती असे ताशेरे ओढले असल्याच्या प्रश्नावर शहा म्हणाले हा निकाल नाही. समोरच्या बाजूच्या वकिलाच्या वक्तव्यावर न्यायमूर्तींनी केलेली टिप्पणी आहे. त्यानंतर शिवसेनेच्या वकिलांनी त्याला समर्पक उत्तर दिले आहे. सत्य काय आहे हे समजून सांगितले आहे. त्यामुळे मला वाटते की निकाल येईपर्यंत त्यावर अटकळी बांधू नयेत. न्यायमूर्ती सुनावणीच्या दरम्यान अनेक प्रश्न विचारत असतात. त्यांना निकाल मानू नये. शेवटी सर्वोच्च न्यायालय आहे त्यांच्याकडून तो निकाल येईल तो सर्वांनी मान्य करायला हवा
