अभिनेता सलमान खान सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे त्याला जीवे मारण्याची धमकी मिळालेली असताना दुसरीकडे त्याच्यासमोर अजून एक मोठी अडचण वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. पत्रकारासोबत गैरवर्तन केल्या प्रकरणी अभिनेता सलमान खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. आपल्या बॉडीगार्डसोबत अभिनेत्याने एका पत्रकारावर हल्ला करून त्याला धमकावल्याचा आरोप सलमान खानवर आहे. त्याप्रकरणी सलमानला दिलासा मिळाला आहे.
सलमान खान अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना एका कथित पत्रकारानं त्याचं शूटिंग केलं. हे शूटिंग त्यानं युट्यूबवर अपलोड करण्यासाठी केले होते. ही बाब सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाला आवडली नाही. त्यामुळे सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकानं त्याला शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली अशी तक्रार पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरीच्या डी.एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. हे प्रकरण जेव्हा कोर्टात पोहोचलं तेव्हा कोर्टानं समन्स जारी करुन सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणी सलमाननं आणि त्याच्या सुरक्षारक्षकानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी झाली. कोर्टानं दोन्ही याचिकांचा स्विकार करत हे संपूर्ण प्रकरण कोर्टानं रद्द केलं आहे.
22 मार्च 2022 रोजी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने सलमान खानला समन्स पाठवले होते. त्याला हजर राहण्यासाठी 5 एप्रिल 2022 ही तारीख देण्यात आली होती. मात्र, हजर न होता या समन्सविरोधात सलमानने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता चार वर्षांनंतर या प्रकरणी निर्णय आला आहे.
