संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली. जाळपोळ करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांसह 20 वाहनांना आगी लावण्यात आल्या. या राड्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रमजान महिना सुरू आहे. आज रामनवमी आहे. त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजीनगरातील लोकांना शांत राहण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच काही राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी उलटसुलट विधाने करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे. काही लोकांकडून भडकाऊ भाषण देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत काय बोलावं, याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. सर्वांनी शांतता राखायला हवी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या घटनेला कोणी राजकीय रंग देत असतील तर यापेक्षा जास्त दुर्देवी काहीही नाही, दरम्यान रात्री किराडपुरा भागात राडा करणाऱ्या तरुणांची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर सद्या या भागातील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जात आहे. त्यानुसार राडा करणाऱ्या सर्वच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहित पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे.
