काँग्रेसच्या काळात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) कसा धक्कादायक वापर झाला याची कहाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे. राज्याचा गृहमंत्री असताना पोलीस चकमक प्रकरणात अटक केल्यावर सीबीआयचे अधिकारी आपल्यावर दबाव आणत होते. एकच म्हणत होते. कशाला त्रास करून घेता. मोदींचे नाव घ्या. तुम्हाला सोडून देऊ. अशी धक्कादायक माहिती शहा यांनी दिली.
न्यूज 18 या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमित शहा म्हणाले, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर कसा असतो हे मी तुम्हाला सांगतो. मी त्याचा बळी आहे. आमच्या विरोधात काँग्रेसने कोणती भ्रष्टाचाराची केस नव्हती. एक एन्काऊंटर झाला होता. मी गुजरातचा गृह मंत्री होतो. या प्रकरणात सीबीआयने मला अटक केली. त्यांच्या 90% प्रश्नात एकच होते. कशाला त्रास करून घेता? मोदींचे नाव घ्या. तुम्हाला सोडून देऊ. जर प्रामाणिकपणे तपास केला असेल आणि काँग्रेसने पुरावे नष्ट केले नसतील तर सीबीआयच्या रेकॉर्डमध्ये या टेप आजही असतील. पण आम्ही त्यावेळी काळे कपडे घालून आंदोलन केले नाही. एका राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) बनवली. कोणताही भ्रष्टाचाराचा मुद्दा नव्हता. दंगलीमध्ये सहभागी असल्याचा खोटा आरोप केला. नंतर हा आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. पण त्यावेळी आम्ही कधी हाय तोबा केले नाही. काळे कपडे घालून संसद बंद पाडली नाही असेही शहा म्हणाले.
मला पकडून तुरुंगात डांबण्यात आले. 90 दिवसाच्या आत जामीन मिळाला. अटक करण्यासाठी पुरेशी कारणेच नाहीत असे ताशेरे न्यायालयाने ओढले. गुजरातच्या बाहेर मुंबईला खटला चालला. मुंबई न्यायालयात मी सुटकेची याचिका केली. न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केलेच. राजकीय बदल्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित होऊन हा खटला दाखल करण्यात आला आहे असे ताशेरे न्यायालयाने ओढले, असेही शहा म्हणाले.विरोधी पक्षाच्या काही नेत्यांवर आत्ता झालेली कारवाई भ्रष्टाचारांच्या प्रकरणात आहे. आपचे सत्येंद्र जैन असोत मनीष सिसोदिया यांना जामीन का मिळत नाही? या देशात न्यायालय आहे. त्यांनी आपली बाजू न्यायालयात मांडायला हवी. केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगाचा आरोप काँग्रेसवाले करतात तेव्हा त्यांनीही लक्षात ठेवावे जेव्हा दुसऱ्यावर आपण एक बोट दाखवतो तेव्हा चार बोटे आपल्याकडे असतात, असा इशाराही अमित शहा यांनी दिला.
