महाराष्ट्र क्रिकेट असोिसएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. रोहित पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अभिषेक बोके हे निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु, रोहित पवार यांनी क्लब वर्गातून सर्वाधिक मतं मिळवत विजय मिळवला होता. परंतु, या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.
काल नाशिकमधील जाहीर सभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्केंनी हा आरोप केला आहे. नरेश म्हस्के म्हणतात अजित पवार साहेब आगोदर आपलं बघा मग मुख्यमंत्र्यांवर टीका करा. तुम्ही रोहित पवारांना पाडण्यासाठी कोणाकोणाला फोन केले. हे जनतेला सांगा मग आमच्यावर टीका करा. जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली. या अगोदर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना पाडा असं सांगण्यासाठी अजित पवार खुद्द अनेकांना फोन करत होते असा खळबळजनक दावा म्हस्के यांनी केला आहे. तसेच, तुम्ही आधी तुमच्या घरातलं पाहा नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करा. असही म्हस्के यावेळी म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळता चर्चेला उधाण आलं आहे.
