आरएसएसला आजचा कौरव म्हणणे भाेवले; राहूल गांधींवर आणखी एक मानहानीचा खटला

आरएसएसला आजचा कौरव म्हणणे काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांना भाेवले आहे. राहूल गांधींवर आणखी एक मानहानीचा खटला दाखल झाला आहे. हरिद्वार न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे.

आरएसएस कार्यकर्ते कमल भदोरिया यांनी त्यांच्याविरोधात हा खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या 12 एप्रिल रोजी होणार आहे. हरिद्वार जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायदंडाधिकारी द्वितीय शिव सिंह यांच्या खंडपीठाने हे प्रकरण दाखल करून घेतले आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आरएसएसला आजचा कौरव असल्याचे म्हटले होते. त्यांनी पुजाऱ्यांविरोधात देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या दोन्ही वक्तव्यांप्रकरणी त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, ९ जानेवारी २०२३ रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे एका जाहीर सभेत आरएसएसचे वर्णन आधुनिक युगातील कौरव असे केले होते. ते म्हणाले होते की, 21 व्या शतकातील कौरव हाफ पँट घालतात. हातात काठ्या घेऊन चालतात आणि शाखा लावतात.भदोरिया यांनी याचिकेत म्हटले आहे की, राहुल गांधींनी फूट पाडणारे वक्तव्य केले आहे. देशातील विविध मंदिरांमध्ये पूजा करूनही काँग्रेस नेत्याने असे वक्तव्य केले आहे. राहुल गांधींना 11 जानेवारीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. यामध्ये राहुल गांधींना या वक्तव्याबाबत माफी मागण्यास सांगितले होते. पण अजूनही त्यांच्याकडून नोटिसीला प्रतिसाद मिळालेला नाही.