सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे येथे नपुसंक सरकार आहे. त्यामुळे या कोणालाही शिव्या घाला, असे वातावरण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य करत ते देव नसल्याचे म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, जाहीर आमंत्रण! या… महाराष्ट्रात कोणालाही शिव्या द्या.छत्रपती शिवाजी महाराजांना द्या…जिजाऊ मातेला द्या महात्मा गांधींना द्या…डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना द्या…महात्मा फुलेंना द्या…क्रांतीज्योती सावित्री माई ला द्या. छत्रपती शाहू महाराजांना द्या…साई बाबांना द्या. यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही याची खात्री आणि शाश्वती आहे. या लवकर या… कुणालाही शिव्या घाला महापुरुषांना घाला, श्रद्धा स्थानांना घाला. असं वातावरण परत मिळणार नाही.
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे बागेश्वर धामची कथा सुरू आहे. कथेदरम्यान विद्वानांशी चर्चा करताना धीरेंद्र शास्त्री यांनी साईबांबाबद्दव वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात, पण देव होऊ शकत नाहीत.’ ते म्हणाले की, ‘कोल्ह्याची कातडी धारण करून कोणीही सिंह बनू शकत नाही.’ शंकराचार्यांचे उदाहरण देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, ‘शंकराचार्यांनी साईबाबांना कधीच देवतेचा दर्जा दिला नव्हता. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे प्रत्येक सनातनीने त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.’
