नेहमी काही ना काही वक्तव्ये करून चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी जबलपूरमध्ये श्री साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांबाबत केले आहे. कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.
शास्त्रींच्या या वक्तव्यामुळे साई भक्तांमधून संतापाची लाट उसळली असुन ठिकठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे. धिरेंद्र शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिर्डीचे आमदार तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी महाराजांचे थोतांड असल्याचे म्हणत धीरेंद्र शास्त्रींवर परखड टीका केली आहे. ते रविवारी शिर्डीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.यावेळी विखे पाटील बोलताना म्हणाले की,अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान ते स्विकारू शकत नाहीत.बाबालोक देवाचे रूप घेऊन लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करताहेत.अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहीजे. हेच बाबा धार्मिक तेढ निर्माण करताहेत, सामाजिक अशांतता निर्माण करताहेत. साईबाबांनी माणसांमध्ये देव बघितला होता. असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
