देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3,824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आज तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, शनिवारी देशात 2995 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर शुक्रवारी 3,095 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १८,३८९ आहे. एकूण आकडेवारीच्या ०.०४ टक्के आहे. कोरोनाच्या उद्रेकापासून आतापर्यंत देशात ४,४७,२२,६०५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ४,४१,७३,३३५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशातीच पॉझिटिव्हिटी रेट ९८.७७ टक्के आहे. तर दुर्दैवी बाब म्हणजे, आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५,३०,८८१ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत दोन वर्षांत २.२ अब्जाहून अधिक कोविड लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत लसीचे २,७९९ डोस देण्यात आले आहेत.
शनिवारी, १ एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या ६६९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या ८१,४४,७८० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १,४८,४४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी राज्यात ४२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
