राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी पती-पत्नीत स्पर्धा; सुजाता सौनिक होऊ शकतात पहिल्या महिला मुख्य सचिव

राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत पती आणि पत्नीत स्पर्धा असल्याचे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सुजाता सौनिक मुख्य सचिव झाल्या तर त्या या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील. ज्येष्ठतेचा विचार केल्यास त्यांचा क्रम वरचा आहे. २००९ मध्ये चंद्रा अय्यंगार या मुख्य सचिव बनण्याच्या स्पर्धेत होत्या पण त्यांना संधी मिळू शकली नव्हती.आता सुजाता सौनिक यांना ती संधी मिळू शकते.

त्यांचे पती मनोज सौनिक हे वित्त विभागाबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागाचेही अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही ते निकटवर्ती मानले जातात. त्यामुळेच स्पर्धेत ते पुढे असल्याचे म्हटले जाते. या दाम्पत्याशिवाय महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांचे नावही स्पर्धेत असले तरी त्यांना लगेच संधी दिली जाण्याची शक्यता नाही. मनोज सौनिक यांची त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कोलकातामधून पत्रकार म्हणून केली होती. ते मूळचे बिहारचे आहेत. सुजाता सौनिक या मूळच्या चंदिगढ येथील आहेत.हे दोघेही 1987 च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत.