“शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल” – नारायण राणे

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या गोंधळानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. या राड्यासाठी एमआयएम, शिंदे गट आणि भाजप जबाबदार असल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. तर शिंदे गट आणि भाजपकडूनही यावर पलटवार करण्यात आला आहे. यातच शरद पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले असून, शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल, असे मोठे विधान केले आहे.

बोलताना संयम असावा. कुणाचीही मन दुखावली जातील, असे बोलायला नको असे मला वाटते. पवारांनी चिंता व्यक्त केली. सरकार त्यांचे राहिलेले नाही. त्यांचे सरकार असताना लोकांना जास्त चिंतीत टाकले होते. चिंताग्रस्त लोक होती. कारण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता. तुम्ही म्हणाला उद्धव ठाकरे कोण होते? तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

निलेश राणे यांनी आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या आंबा महोत्सवाचंही त्यांनी कौतुक केलं. निलेश राणे यांनी चांगला उपक्रम राबवला आहे. गेली अनेक वर्ष मी कोकणाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांच्या तुलनेत कोकण प्रगत झालाय. आजचा विषय आंब्याच्या ब्रँडीगचा आहे. आजकाल कृषी विद्यापीठ आहेत. मात्र आंबा कसा पिकवावा, बायप्रॉडक्ट कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात नाही, असं राणे म्हणाले.