छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा

महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात संयुक्त जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत. त्याची सुरुवात आज छत्रपती संभाजीनगरमधून होत असून, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता सभेला सुरुवात होणार आहे. या सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

संभाजीनगरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे ही सभा होणार की नाही याबाबत संभ्रम होता. परंतु, पोलिसांनी मविआला 15 अटी व शर्थीवर सभेची परवानगी दिली आहे. यात मविआने जाहीर सभा सायं. 5 ते रात्री 9.45 या वेळेतच घ्यावी. वेळ आणि कार्यक्रमाच्या ठिकाणात कोणताही बदल करू नये. आक्षेपार्ह घोषणाबाजी, असभ्य वर्तन, हुल्लडबाजी होणार याची काळजी घ्यावी. सभेला जाताना किंवा येताना बाईक रॅली काढू नये. कार्यक्रमाच्या वेळी कोणताही रस्ता रहदारीसाठी बंद करू नये. वाहतुकीला कोणाताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. कार्यक्रमादरम्यान शस्त्र, तलवारी वापरू नये. सभेसाठी आलेल्या वाहनांनी पोलिसांकडून जारी केलेल्या मार्गानेच प्रवास करावा. सभेसाठी आवश्यक त्या शासकीय विभागाची परवानगी घ्यावी, अशा अटी-शर्थींवर परवानगी दिली आहे.